एकेकाचे स्वभाव मराठी निबंध - Aikekache Swabhav Marathi Nibandh

एकेकाचे स्वभाव मराठी निबंध - Aikekache Swabhav Marathi Nibandh

विविधतेची निसर्गात लयलूट असते. दगड, पशू, पक्षी, झाडेझुडपे, फळेफुले.... त्यातही रूप, गंध, रंग यांची किती विविधता.... विविधता हा निसर्गाचा आत्माच !.... माणसांचंही असंच आहे. “पिंडे पिंडे मतिर्भिन्ना !" माणसांचे स्वभाव किती वेगवेगळे !!.... चांगला आणि वाईट असेच खरे तर विभाजन होईल.

दुसऱ्याचं दु:ख पाहून कष्टी होणारे, सर्वांचं कल्याण चिंतणारे, संत चांगले तर दुसऱ्याचं दु:ख पाहून आनंदी होणारे, दुसऱ्याचं वाईट चिंतणारे, जुलमी, पीडा देणारे वाईट.... उमदा, कोता, दिलदार, कुजका, दुष्ट, प्रेमळ, रागीट, गोड, लाघवी, बडबड्या, घुम्या, उधळ्या, कंजूष, मानी, लुब्रा, वेंधळा, करडा, विसराळू.... स्वभावाच्या किती परी! 

मृत्यूलाही ओशाळायला लावणारा संभाजी मानी तर औरंगजेबाच्या हातावर तुरी देणारा शिवाजी धोरणी, तलवार गाजवणारा पहिला बाजीराव धाडसी तर जेवणावळी गाजवणारा दुसरा बाजीराव आळशी, पळपुटा, . प्रश्नाला उत्तर म्हणून प्रश्नच विचारणारा व. पु. काळ्यांच्या गोष्टीतला जोशी भांडखोर तर पैशाची व रूपाची श्रीमंती असूनही गरीब साध्या इंदूशी आणि लेखकाशी मैत्रीचा धागा राखणारा पु.लं.चा नंदा प्रधान वरून कोरडा पण अंतर्यामी हळवा,... करून सवरून 'तो मी नव्हेच' म्हणून सर्वांना टोप्या घालणारा अत्र्यांचा लखोबा लोखंडे बेरकी तर स्मरणासाठी उपरण्याला गाठी मारणारा व कुठली गाठ कशाची, ह्याचेच विस्मरण होणारा गडकऱ्यांचा गोकुळ विसरभोळा.... 'दुरितांचे तिमिर जावो' म्हणत जगणारा बाळ कोल्हटकरांचा दिगू - 'साधा, सरळ, भोळा...' तर श्री.ना. पेंडशांचा 'गारंबीचा बापू' अफाट.... जग हे माणसांच्या स्वभावांचं म्युझियमच !

'स्वभावो दुरतिक्रमः ।' 'स्वभावाला औषध नाही' असं म्हणतात. जन्मतः आपण तसे असतो का ? स्वभावाला वारसा असतो का ? कसं शक्य आहे ? मग स्वभावांची घराणी झाली असती ! 'सूर्यापोटी शनी' आले नसते. “घटाघटाचे रूप आगळे, प्रत्येकाचे स्वभाव वेगळे" 

हेच दिसते. परिस्थिती, संस्काराने स्वभाव घडत वा बिघडत जातात. एकदा का ते पक्के झाले की “वळणाचे पाणी", "कुत्र्याचे शेपूट", "मूळ स्वभाव जाईना" म्हणतात. ... कृती, सवयी, गुण, अवगुण यांची स्वभावाशी सांगड घालतात. मूलतः सारे एका माणसात असतेच. म्हटलंच आहे

“वाईट आणि चांगला। 

स्वभाव असे आपला॥

कधी एक दिसतो। 

दुसरा लपून असतो। 

माणूस इथेच फसतो॥" 

कृती कधी कधी स्वभावाविरुद्ध असते. सवयी अनुकरणप्रियतेने येतात त्या बदलतातही!... स्वभाव हा अनेक गुणावगुणांचा गुच्छ असतो. ज्याचं प्रमाण जास्त तो त्याचा स्वभाव म्हटला जातो. दुष्ट, क्रूर, वाईट दरोडेखोराच्या मुलांना त्यांचा बाप प्रेमळच वाटतो. 

मला तुसड्या वाटणारा तुम्हाला सडेतोड, बाणेदार वाटतो. दिलदार हा बावळट, भोळासांब वाटतो. दिलदार, हौशी, आनंदी, मानी, मिळून उमदा स्वभाव होतो. तसा अनेक गुणांचा समुदाय एका स्वभावाच्या पोटी असतो. परिस्थिती किंवा संस्कार ही एका मर्यादेपर्यंतच त्याला कारणीभूत होतात. मूळ स्वभाव त्या पलीकडचा आहे.

'स्वभावो न उपदेशेन कर्तुम् अन्यथा।

सुतप्तस्य अपि पानीयं पुनर्गच्छति शीतताम्॥'


SHARE THIS

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.

0 Comments: